जालना- शहरात होऊ घातलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जालन्याच्या
दोन राजकीय मल्लांची कुस्ती आधीच रंगलेली दिसत आहे. हा आखडा जरी
महाराष्ट्र केसरीचा असला तरी चर्चा राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या राजकीय कुस्तीची होत आहे. अर्जुन खोतकर
यांनी दानवे पिता – पुत्रांची नावे निमंत्रण पत्रिकेतून वगळत पहिला डाव टाकला आहे.
अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे
यांच्यातील सख्य लपून राहिलेले नाही. दोन्ही नेते एकमेकाला चीतपट करण्यासाठी कायम
डावपेच खेळत असतात. महाराष्ट्र केसरी कृस्ती स्पर्धेचे संयोजक पद स्वीकारणाऱ्या
खोतकर यांनी दानवे पिता – पुत्र वगळता जिल्ह्यातील सर्व नेत्यांची नावे निमंत्रण
पत्रिकेत टाकली आहेत. त्यामुळे खोतकर-दानवे यांच्यातील संघर्ष आणखीनच तीव्र होताना
दिसत आहे.
राज्य
सरकारमध्ये राज्यमंत्री असणारे अर्जुन खोतकर हे मागील अनेक महिन्यांपासून रावसाहेब
दानवे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवत आहेत. दोन्ही
नेत्यांमध्ये अनेकदा जाहीरपणे खटके देखील उडाले आहेत. दरम्यान, जालन्याच्या राजकारणाचा मीच पेहेलवान
आहे, आखाड्यात जो कुस्ती लढणारा आणि जिंकणारा असतो त्याचे
नाव निमंत्रण पत्रिकेत नसते म्हणत रावसाहेब दानवे यांनी देखील पलटवार केला आहे.